मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – Mumbai District Central Co-operative Bank

By | January 5, 2022

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – Mumbai District Central Co-operative Bank

महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रातील पुढारलेले राज्य असून राज्यभरात सहकारी संस्थांचे मोठे जाळे पसरले आहे. सहकारी पतपुरवठा संस्था, बिगर कृषी पतपुरवठा संस्था, विपणन सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांची स्थापना झाली. त्या यशस्वीपणे कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिक, शेतकरी या ना त्या कारणामुळे सहकारी संस्थेच्या संपर्कात आला. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला सुमारे शंभर वर्षाहून अधिक काळाचा इतिहास आहे 

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेची स्थापना : सन १९२३ मध्ये झाली. या बॅंकेचे पुढे राज्य शिखर बँकेत रूपांतर होऊन ती सध्या ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड’ म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याबाबत त्रिस्तरीय रचना स्विकारलेली आहे. प्राथमिक स्तरावर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, तर राज्य स्तरावर राज्य सहकारी बँक (शिखर बँक) कार्य करते. स्वातंत्र्यानंतर सन १९५१ मध्ये प्रा.धनंजयराव गाडगीळ व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील यांच्या मार्गदर्शनामुळे प्रवरा सहकारी साखर कारखाना लि., प्रवरानगर जि.अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी सहकारी चळवळीचे एक नवे पर्व सुरू केले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 

महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० या कायद्यानुसार सहकारी संस्थांचे नियमन व नियंत्रण केले जाते. सन १९६१ मध्ये महाराष्ट्रात विविध प्रकारच्या ३१,५६५ सहकारी संस्था होत्या. मार्च २०१८ अखेर ही संख्या १,९८,२५२ पर्यंत पोहोचली. सहकारी संस्थांच्या संख्येत जसजशी वाढ झाली तसतशी सहकारी संस्थांच्या सभासद संख्येत, भागभांडवल, कर्जे, ठेवी यामध्ये वाढ झाली. देशातील सहकारी संस्थाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र शासनाने ९७ वी घटनादुरुस्ती अधिनियम २०११ अन्वये सहकार कायद्यात काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्रशासनाने १४ फेब्रुवारी, २०१३ रोजीच्या अध्यादेशाद्वारे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० मध्ये सुधारणा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *